मुंबई : केंद्र शासनाच्या ‘वाहतूक सुरक्षा विधेयक २०१४’ला तीव्र विरोध करीत वाहतूक कामगारांच्या केंद्रीय संघटनांनी १८ डिसेंबरला देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्ली येथील जंतरमंतरवर होणाऱ्या धरणे आंदोलनादरम्यान कामगार संघटना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना घेरणार आहेत.यासंदर्भात रविवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अॅड. उदयकुमार आंबोणकर म्हणाले, की प्रस्तावित विधेयकात परिवहन कर्मचारी व व्यवस्था यांना उद्ध्वस्थ करणाऱ्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. त्या वगळण्याची मागणी करीत १३ राज्यांतील आणि ८ केंद्रीय कर्मचारी संघटना १८ डिसेंबरला होणाऱ्या धरणे आंदोलनात सामील होणार आहेत. या संघटनांनी तयार केलेल्या कृती समितीतर्फे धरणे आंदोलनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात येईल. त्या वेळी तोडगा निघाला नाही, तर देशव्यापी बंदची घोषणाही करण्यात येईल. मात्र नेमका कधी आणि किती दिवस बंद करायचा, हा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेण्यात येईल.याआधी शनिवारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना आणि बेस्ट वर्कर्स युनियनने सयुक्तिकपणे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यात देशभरातील केंद्रीय संघटना व वाहतूक कामगार व स्वयंरोजगार मालक-चालकांच्या संघटनांनी भाग घेतला. दरम्यान, झालेल्या चर्चेअंती देशव्यापी धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
कामगार संघटना गडकरींना घेरणार !
By admin | Updated: November 24, 2014 03:37 IST