मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला १ एप्रिलपासून कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ‘समृद्धी’वरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली आहे. हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना १,४४५ रुपये, तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी १२९० रुपये टोल लागेल.
नागपूर ते मुंबई या ७०१ किमी अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किमीचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच ‘एमएसआरडीसी’ने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे.
यापूर्वी महामार्ग सुरू झाला तेव्हा म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये पथकर आकारला होता.
नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी टोल किती?वाहनांचा प्रकार सध्याचे दर नवे दरकार, हलकी मोटार १०८० १२९०हलकी, व्यावसायिक, मिनी बस १७४५ २०७५बस अथवा दोन आसांचा ट्रक ३६५५ ४३५५तीन आसांची व्यावसायिक ३९९० ४७५०अवजड बांधकाम यंत्रसामुग्री ५७४० ६८३०अति अवजड वाहने ६९८० ८३१५
१ एप्रिलपासून नवे टोलदर लागू होणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत ते लागू राहतील, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.