- प्रफुल्ल गायकवाड
विष्णुबुवा जोग (जन्म - १४ सप्टेंबर १८६७ मृत्यू - ५ फेब्रुवारी १९२०)
विष्णु नरसिंह जोग हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे संतपुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ होतेआणि लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.
चरित्र
विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.
विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबा महाराजांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीवरील माळ स्वतःच गळ्यात घालून घेतल्री आणि ते वारकरी झाले.
विष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी संतांना आणि संतवाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले त्यात जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले आहे.
भजने, ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा जोगबुवांचा दिनक्रम बनला. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर ते कीर्तने करू लागले. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला.
विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. अशा या स्पष्टवक्त्या, निर्भीड, सत्यनिष्ठ आणि विशुद्ध आचरणाच्या जोगमहाराजांसारख्या माणसाला महानुभावपंथीयांनी भरलेल्या एका बदनामीच्या, अब्रनुकसानीच्या न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. १९०७ मध्ये हा खटला जळगाव कोर्टात भरण्यात आला होता. जोगमहाराजांचे शिष्योत्तम प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी विष्णुबुवांचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांच्या अनेकानेक उत्तम गुणदर्शनांबरोबर जळगाव खटल्याचीहीहकीकत वाचायला मिळते.
वारकरी कीर्तन
जोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीला, वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली.
मृत्यू
फेब्रुवारी ५, १९२० रोजी विष्णुबुवा जोगांचे निधन झाले. त्यावेळी केसरीत टिळकांनी लिहिलेला मृत्युलेख छापून आला होता.
सौजन्य : मराठी विकिपीडिया