ठाणे : दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर का असेना, पण बाळकुम येथे असलेल्या विद्यापीठाच्या ठाणे परिक्षेत्रात जाण्यासाठी अखेर टीएमटीची सेवा येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि शारीरिक त्रास कमी होणार आहे. सुरुवातीला दिवसातून बसेसच्या ४ फेऱ्या होणार आहेत.बाळकुम परिसरात मुंबई विद्यापीठाचे परिक्षेत्र आहे. मुख्य रस्त्यापासून हे थोडे आतमध्ये असल्याने तेथे पोहोचण्यासाठी खाजगी वाहन असेल तर सोयीचे ठरते, अन्यथा पायपीट करावी लागते. ठाणे स्टेशनवरून स्वतंत्र रिक्षाने येणे तर खर्चिक पडते. त्यामुळे विशेषत: विद्यार्थ्यांचे हाल होतात. त्यांच्या सोयीकरिता परिक्षेत्रापर्यंत टीएमटी सेवा सुरू करावी, अशी मागणी अनेकदा महानगरपालिकेच्या परिवहन समितीकडे करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या एका बैठकीदरम्यान महापौर संजय मोरे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. त्यांनी तत्काळ ती मान्य करून रेल्वे स्टेशन ते ठाणे परिक्षेत्र या मार्गावर येत्या आठवड्यापासून बसेस चालवल्या जातील, अशी माहिती परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना दिली. रेल्वे स्टेशन येथून जाण्यासाठी सकाळी ७.३० आणि ९.३० तर पुन्हा येण्यासाठी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत फेऱ्या सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)
स्टेशन ते विद्यापीठ परिक्षेत्र मार्गावर टीएमटी
By admin | Updated: July 4, 2016 03:35 IST