सासवड : रात्रगस्त घालणाऱ्या सासवड पोलिसांच्या वाहनाला शनिवारी मध्यरात्री अपघात होऊन तीन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. हवालदार शशिकांत निवृत्ती राऊत (५२), अविनाश तुकाराम ढोले, (४८) आणि उल्हास अनंता मयेकर (५०) अशी मृतांची नावे आहेत. राज्याचे जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बंदोबस्तावर असलेले हे तिघे पोलीस दवणेवाडी (पुरंदर) येथून शनिवारी मध्यरात्री पानवडी घाटाच्या मार्गाने सासवडकडे येण्यास निघाले. याच मार्गावर, ‘मालदरा’ ओढ्याच्या परिसरात त्यांची गाडी दगडी कठड्याला धडक देत २० ते २५ फूट खाली गेली. या परिसरात फारशी रहदारी नसल्याने तसेच घाटरस्त्यात मोबाइल रेंज मिळत नसल्याने अपघात कोणालाही समजला नाही. पानवडी येथील ज्ञानेश्वर लोळे, विशाल लोळे, स्वरूप लोळे हे तिघे पहाटे सासवड येथे कंपनीच्या कामासाठी येत असताना त्यांनी प्रथमत: हा अपघात पहिला. त्यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये येऊन यासंबंधी खबर दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती, की गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. उल्हास मयेकर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी; अविनाश ढोले यांच्यामागे आई, पत्नी, एक विवाहित मुलगी, एक मुलगा; तर शशिकांत राऊत यांच्यामागे आई, पत्नी, एक विवाहित मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
तीन पोलिसांवर काळाची झडप
By admin | Updated: December 29, 2014 05:12 IST