पुणे : काँग्रेसची स्थापना एतद्देशीयांच्या भावना इंग्रज सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवण्यासाठी झाली होती. तिला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याच्या मार्गावर लोकमान्य टिळकांनी आणले. देशातील सर्वसामान्यापर्यंत राष्ट्रवादाची भावना सर्वप्रथम त्यांनीच नेली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिक पवार यांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, महापौर प्रशांत जगताप,उपहापौर मुकारी अलगुडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे आदी या वेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, लोकमान्यांच्या काळात देश अखंड नव्हता. राज्ये होती, त्यांना राजे होते. लोकमान्यांनीच सर्वप्रथम अखंड हिंदुस्थान ही भावना निर्माण केली. त्याला राष्ट्रवादाची जोड दिली. आपल्याला त्यांची स्वराज्याची घोषणा आठवते, मात्र स्वराज्याबरोबरच ते सुराज्याचाही विचार करीत होते. शेती, पाणी, उद्योग, जोडधंदे, उपेक्षितांना न्याय याबद्दल आपण आज बोलत असतो, पण लोकमान्यांनी त्या काळात या सर्व गोष्टींचा विचार केला होता. लोकांचे जीवन समृद्ध कसे होईल याच ध्यासाने ते काम करीत. शिंदे यांनी भाषणात महात्मा गांधी, नेहरू यांची शेतीबाबतची भूमिका पवार यांनी पुढे नेली, असे सांगितले. देशस्तरावर कृषीक्षेत्रात केलेले त्यांनी काम फार मोठे आहे. आज देश अन्नधान्यांची निर्यात करतो आहे त्याचे श्रेय त्यांनाच आहे. (प्रतिनिधी)पुरस्काराच्या १ लाख रूपयांमध्ये स्वत:चे ४ लाख रूपये जमा करून ही ५ लाख रूपयांची रक्कम पाषाण येथील डॉ. आशुतोष रेगे संचलित ‘संतुलन’ या दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी गेली काही वर्षे शाळा चालविणाऱ्या संस्थेस देत असल्याचे पवार यांनी जाहीर केले. महापौर जगताप यांच्याकडे त्याचा धनादेश देत ही रक्कम संस्थेकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादाची भावना टिळकांनीच रुजविली
By admin | Updated: August 2, 2016 05:17 IST