रेल्वेस्थानकातील घटना : क ॉम्प्युटर, प्रिंटरसह एसी जळाले, प्रवाशांची पळापळ नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील पश्चिम गेटसमोरील तिकीट काऊंटरला आज सकाळी १0.४५ च्या सुमारास आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी, कार्यालयीन उपयोगाचे साहित्य खाक झाले आहे. नेमकी आग कशाने लागली याचे कारण कळले नसले तरी, आगीच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिम द्वारावर आठ खिडक्यांचे तिकीट काऊंटर आहे. यातील पाच काऊंटरवर तिकीट विक्री होते. सध्या सिझन असल्याने काऊंटरवर प्रवाशांची चांगलीच गर्दी असते. आज सकाळीसुद्धा काऊंटरवर प्रवाशांची रांग लागली होती. १0.४५ च्या सुमारास सर्व्हर असलेल्या ८ क्रमांकाच्या खिडकीत अचानक धूर निघायला सुरुवात झाली. तिकीट काऊंटरवरील एका कर्मचार्याच्या हे लक्षात आल्याने, त्याने सर्वांंंना अलर्ट केले. दरम्यान रांगेत लागलेल्या प्रवाशांची पळापळ सुरू झाली. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना काऊंटर परिसरातून बाहेर काढले. सर्वप्रथम तिकीट काऊंटरवर गोळा झालेली कॅश घेऊन कर्मचारी बाहेर पडले. सर्व कर्मचारी बाहेर आल्यानंतर काऊंटरवर असलेल्या आग प्रतिबंधक उपकरणाद्वारे कर्मचार्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान अग्निशमन विभागालाही सूचना देण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात अग्निशमनाचे तीन बंब रेल्वेस्थानकावर येऊन धडकले. १५ ते २0 मिनिटात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र यात कार्यालयीन साहित्य खाक झाले होते. आगीमुळे पश्चिम गेटकडील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे रिझर्व्हेशनचे काम दीड तास खोळंबले होते. प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी दोन अतिरिक्त काऊंटर वाढविले, तसेच बीपीटीचे सुद्धा दोन काऊंटर सुरू करण्यात आले. (प्रतिनिधी)
तिकीट काऊंटर खाक
By admin | Updated: June 1, 2014 01:05 IST