ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - रात्री गस्तीवर असलेल्या पुणे पोलिसांची जीप ३०० फुट खोल दरीत कोसळल्याने तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेही सासवड पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
सासवड पोलिस ठाण्यातील अविनाश ढोले, शशिकांत राऊत आणि उल्हास मयेकर हे तिघे हवालदार शनिवारी रात्री ड्यूटीवर होते. रात्री गस्त घालण्यासाठी हे तिघेही जीप घेऊन निघाले. अविनाश ढोले हे जीप चालवत होते. सासवडजवळील पानवडी घाटात ढोले यांना रस्त्याचा अंदाज आला नाही व जीप थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सासवड पोलिस ठाण्यात शोककळा पसरली आहे.