अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत.बार्शी विधानसभा शिवसेनेने मागितली आहे. भाजपही त्यासाठी फार आग्रही नाही. २०१४ साली तेथून आयत्यावेळी भाजपच्या तिकीटावर राजेंद्र मिरगणे उभे होते. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळावर सहअध्यक्ष केले असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. राजा राऊत हे शिवसेनेत होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र सोपल सेनेत गेले तर राऊत अपक्ष म्हणून उभे राहू शकतात.
सोपल यांनी त्यांचा आर्यन साखर कारखाना विकला, पण शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. त्यातून तक्रारी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सोपल यांना शिवबंधन बांधायचे आहे. सोपल राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले.विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून निवडून आले आहेत. त्यांना २०१४ साली टक्कर देणारे कमलाकर वळवी हे आता शिवसेनेत आहेत. त्यावेळी त्यांना दोन नंबरची मते मिळाली होती. शिवाय तेव्हा भाजपमध्ये असणारे जगदीश धुडी हे आता शिवसेनेत असून ते ही इच्छुक आहेत. या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोपा आहे. म्हणून तरे शिवबंधन बांधण्यास तयार झाले आहेत. दहीहंडीच्या दिवशी ते शिवसेनेच्या कार्यक्रमातही जाऊन आले.
या बदलानंतर जिल्ह्यात त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची पाटी कोरी असणार आहे. राधाकृष्ण विखे आधीच भाजपमध्ये गेल्यामुळे राजकीय दृष्टीने तुल्यबळ असणाºया अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसकडे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (संगमनेर) आणि श्रीरामपूरचे भाऊसाहेब कांबळे हे दोनच आमदार उरले आहेत. थोरात यांना काँग्रेस, राष्टÑवादी आघाडी मजबूत करण्याचे काम जिल्ह्यातूनच सुरु करावे लागले.