औरंगाबाद : मराठवाड्यात उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच जालना, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. औरंगाबाद तालुक्यातील पळशी येथे शेतात क्रिकेट खेळत असलेली मुले पाऊस आल्यावर बाभळीच्या झाडाखाली थांबली असतानाच वीज पडल्याने राजेंद्र बाबासाहेब पळसकर (१२, रा. पळशी) हा मुलगा जागीच ठार झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे सायंकाळी वीज पडून राघो पुंजाजी किटे (४६) या मेंढपाळाचा मृत्यू झाला आणि विष्णू तानाजी भवरे (३९) हे गंभीर जखमी झाले. जाफराबाद बाजार समिती परिसरात वीज पडून अक्षय एकनाथ मापारी हा सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. तसेच १६ मेंढ्या जखमी झाल्या.कंधार (जि. नांदेड)मधील आनंदवाडी येथे वीज पडून मधुकर ऊर्फ मदन परमेश्वर खाडे (२५) हा युवक शेतकरी ठार झाला, तर उद्धव अशोक खाडे हा युवक भाजला. त्याच्यावर कंधार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (प्रतिनिधी)
मराठवाड्यात वीज कोसळून तीन ठार
By admin | Updated: March 29, 2016 01:19 IST