ठाणे : अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयारामांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेतील बंडखोरींना अपक्ष म्हणून मैदानात नशिब अजमावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, यातील तब्बल ९० टक्के बंडोबांचे बंड थोपविण्यात शिवसेनेला यश आले आहे. यामध्ये अधिक नाराज झालेल्या पूजा वाघ, नम्रता जाधव, अश्विनी जगताप, निलेश लोहाटे आदींसह इतर बंडखोरांना शिवसेनेने पुन्हा अनेक वादे दिले आहेत. परंतु, शिवसेना हे वादे पूर्ण करणार का याचा निर्णय निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतरही या दोन्ही पक्षात तिकीट नाकारण्यात आल्याने बंडखोरी झाली होती. अनेकांनी थेट बंडखोरी करुन शिवसेनेच्या श्रेष्ठीनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फटकादेखील शिवसेनेला बसण्याची शक्यता होती. पूजा वाघ यांनी तर नाराज होऊन पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली होती. तर नम्रता जाधव यांनीदेखील अशाच प्रकारे प्रचाराचा धडाकाही सुरु केला होता. असाच काहीसा प्रकार अनेक प्रभागातून दिसून येत होता. अखेर शिवसेनेने मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बैठका घेऊन ९० टक्के बंडोबांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पूजा वाघ यांच्यासह अश्विनी जगताप, गणेश पाटील यांच्या पत्नी, निलेश लोहटे, रामदास पडवळ, हेमलता पडवळ, कृष्णकुमार नायर, दळवी, कांबळे आदींसह इतरांनीदेखील माघार घेतली आहे. माजी महापौर स्मिता इंदूलकर, आणि संगीता घाग यांनीदेखील माघार घेतली असली तरी त्या शिवसेनेला सहकार्य करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत नाही. चंद्रगुप्त घाग यांच्यासह आरती हर्षल वाघ यांनीदेखील निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. दरम्यान शिवसेनेचे प्रभाग क्र. ६ मधील उमेदवार दिलीप बेंदुगडे यांनी योग्य कागदपत्रे न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेने थोपविले अखेर नाराजांचे बंड
By admin | Updated: February 8, 2017 04:09 IST