औरंगाबाद : भूजल पातळीचा कुठलाही विचार न करता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला. मात्र पुरेशा पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळीत मोठी घट झाल्याने आता हे हातपंप ऐन पावसाळ््यातच कोरडे पडले आहेत. हातपंपांसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तर आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. विभागीय आयुक्तालयाला जिल्हा पातळीवरून हातपंपांची माहिती मिळाली आहे. त्यातून मराठवाड्यातील स्थितीचा उलगडा झाला आहे. नवीन हातपंप घेण्यासाठी १,५३२ गावांत ७ कोटी १० लाख रुपयांचा खर्च झाला तर १,४६५ गावांतील हातपंप दुरुस्तीसाठी दिलेला १ कोटी ५५ लाखांचा निधी एकप्रकारे वाया गेल्याचे चित्र आहे.१ आॅक्टोबर २०१४ पासून विभागातील पाणी टंचाई आराखड्यावर प्रशासनाने निधी देण्यास सुरुवात केली. ३० जून २०१५ पर्यंत विभागात नव्याने हातपंप घेणे आणि जुन्याची दुरुस्ती करण्यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाले. मात्र त्यानंतर पाणी टंचाई कायम आहे. हातपंपांचे पुनर्भरण करण्यासाठी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४१ हातंपप बसविण्यात आले. त्यावर २ कोटी ८९ लाख रुपये खर्च झाले. त्याखालोखाल लातूर जिल्ह्यात २४७ हातपंपांवर ९० लाखांचा खर्च झाला. नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५८ हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली. त्यापोटी ९८ लाखांचा निधी दिल्याचे दाखविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मराठवाड्यात हातपंपांचे कोटीच्या कोटी उड्डाणे
By admin | Updated: July 21, 2015 01:40 IST