मुंबई : केवळ मुस्लिम आहे म्हणून झिशान खान या तरूणाला नोकरी नाकारणाऱ्या हरे कृष्णा कंपनीचे संचालक व नोकरी नाकारणाऱ्याचा मेल करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जावर उद्या मंगळवारी सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यास या सर्वांना कधीही अटक होऊ शकते.कंपनीचे संचालक भास्कर शांतीलाल जोशी, महेंद्र देशमुख, घनश्याम ढोलकिया, हसमुख ढोलकिया व महिला कर्मचारी दीपिका टीके यांनी हा अर्ज केला आहे. कंपनीत ७० कर्मचारी मुस्लिम आहेत. मेल पाठवणाऱ्या दीपिकाला कंपनीचे धोरण माहिती नाही. त्यामुळे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हाच आधारहिन आहे. दीपिकानेही याप्रकरणी माफी मागितली आहे. तसेच पोलिसांनी जबाब नोंदवले असून यासाठी अर्जदारांनी पूर्ण सहकार्य केले आहे. तेव्हा यात अटकपूर्व जामीन मंजूर करा, अशी मागणी या अर्जात एकत्रितपणे या सर्वांनी केली आहे.मात्र याला खान याने विरोध केला आहे. मुळात याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात दाखल करायला हवा, असा दावा खानने केला आहे. सोमवारी उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाला व न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला.
नोकरी नाकारणाऱ्यांना अटक होणार?
By admin | Updated: June 2, 2015 02:17 IST