मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिस:या टप्प्याचे भूमिपूजन 26 ऑगस्ट रोजी होत असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समारंभाचे सन्मानपूर्वक निमंत्रण आज केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांना दिले. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असताना मुख्यमंत्र्यांनी औदार्य दाखवीत नायडू यांना सन्मानाने बोलाविले. नायडू यांनीही मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण स्वीकारले.
मुख्यमंत्री चव्हाण आणि नायडू यांच्यात आज राज्यातील नगरविकासच्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पासाठी जपानच्या ‘जायका’ने 13 हजार कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. या वेळी झोपडीमुक्त महाराष्ट्र व याबाबतच्या विविध उपक्रमांची आणि समस्यांची माहिती नायडू यांना दिली. मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करून मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ा उभ्या झाल्या. याबाबत केंद्र सरकारने एसआरएसारखे धोरण निश्चित करावे, अशीही मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मेट्रो रेल्वेचे जाळे महामुंबईमध्ये पसरविण्यावर भर दिला जाईल, असे नायडू यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी आश्वासन द्यावे
नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. सभारंभात ठरवून हुल्लडबाजी करण्यात येत असल्यानेच नागपूरच्या कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला जाणार असेल तरच पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू. मात्र, याबाबत स्वत: पंतप्रधानांनी आश्वासन द्यावे, असे चव्हाण यांनी सांगितले.(विशेष प्रतिनिधी)
च्पुणो मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल.
च्सरकार याबाबत सकारात्मक आहे असून येत्या काही दिवसांत हा प्रस्ताव मार्गी लागेल, असे वेंकय्या नायडू यांनी सांगितले.