ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 14 - संपूर्ण जगात १४ फेब्रूवारी हा दिवस प्रेमीयुगूल युवक-युवतींंकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, वाशिमच्या युवकांनी अशा फालतुगिरीला फाटा देत यादिवशी वंचित, गोरगरिबांना पोटभर जेवण देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीचा ‘रोटी डे’ साजरा केला. युवकांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून तोंडभरून कौतुक झाले. ‘रोटी डे’च्या माध्यमातून वाशिम शहरातील गोरगरिब वसाहतींमधील, रेल्वेस्थानक, बसस्थानकामधील फलाटांवर वास्तव्य करणाºया गोरगरिबांना युवकांनी यानिमित्त पोटभर जेवू घालत सामाजिक दायित्व पार पाडले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल सांगळे, अतुल राऊत, आशिष रंगे, नीलेश जाधव, समर ठाकूर, उमेश बोरकर, वैभव सांगळे, सतीश सानप, विजय अपोतीकर, गणेश सानप, राम घुगे, चेतन देशमुख, प्रसन्न साबळे, नंदकिशोर यादव आदी युवकांनी पुढाकार घेतला.