जळगाव : महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ६,३५२ तर जळगाव जिल्ह्यातील ४४८ ग्रामंपचायतीत वर्षभरात ‘मनरेगा’चे एकही काम झालेले नसल्याचा आरोप स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.स्वराज अभियानातर्फे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थानमधील दुष्काळग्रस्त भागात दौरा करून संवेदना यात्रा काढण्यात आली होती. त्यातील निरीक्षणांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन आगामी काळातील दुष्काळीस्थिती आणि त्यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न केल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गडद झाल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यांपासून ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच खाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मात्र त्याऐवजी जेएनयू, गो-हत्या, आयपीएलसारख्या विषयांवर चर्चा होत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
राज्यातील सहा हजार गावांमध्ये ‘मनरेगा’चे एकही काम नाही
By admin | Updated: April 11, 2016 03:14 IST