नवी दिल्ली : असहिष्णुता व हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेविरुद्ध असल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रक्षोभक भाषणांबद्दल चिंता व्यक्त केली. आर्थिक, सामाजिक किंवा कोणत्याही प्रकारची प्रगती शांतता आणि अहिंसेशिवाय शक्य नाही, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना मुखर्जी यांनी कट्टरवादाचा उल्लेख केला आणि पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक अशांत असलेल्या आंतरराष्ट्रीय वातावरणाने अनेक धोके निर्माण केले आहेत, असे ते म्हणाले.प्राचीन सभ्यता असूनसुद्धा भारत नवीन स्वप्न असलेले आधुनिक राष्ट्र आहे. असहिष्णुता आणि हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेशी दगाबाजी आहे. प्रक्षोभक आणि विखारी भाषणांवर विश्वास करणाऱ्यांना एकतर भारताच्या मूल्यांचे आणि विद्यमान राजकीय भान नाही. शांततेशिवाय आर्थिक, सामाजिक किंवा कुठल्याही प्रकारची प्रगती करता येणे शक्य नाही, याची जाणीव भारतीयांना आहे, असेही ते म्हणाले. संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याच्या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करीत राष्ट्रपती मुखर्जी यांनी लोकशाहीला बळकट करणाऱ्या संस्थांची श्रेष्ठता आणि सन्मान पुनर्स्थापित करणे काळाजी गरज असल्याचे म्हटले आहे. मुखर्जी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. औरंगजेबाने जिझीया लावल्यानंतर शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिले होते. शहाजहाँ, जहाँगीर आणि अकबरदेखील हा कर लावू शकले असते. परंतु त्यांनी आपल्या मनात कट्टरतेला स्थान दिले नाही. कारण त्यांना वाटत होते की, ईश्वराने प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला वेगवेगळे मत आणि स्वभावाच्या स्वरूपात सादर केले आहे. १७ व्या शतकातील हे पत्र एक संदेश आहे, असे मुखर्जी म्हणाले. (वृत्तसंस्था)
शांततेशिवाय आर्थिक, सामाजिक प्रगती नाही
By admin | Updated: August 15, 2014 03:09 IST