ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१५ - सरकारी जाहिरातींमध्ये कोणाचे फोटो झळकतील याचा निर्णयही देशाची न्याययंत्रणाच घेणार असेल तर आता लोकांचा 'तराजू'वरील विश्वास कमी होईल असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे. सलमान खानला झटपट जामीन देणारी न्यायव्यवस्था साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्या सारख्यांना तातडीने जामीन का देत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारी जाहिरातींमध्ये फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती व सरन्यायाधीश या तिघांचेच फोटो झळकू शकतील, मुख्यमंत्री व अन्य नेत्यांना सरकारी जाहिरातींमध्ये झळकता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निकालावर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीचा डंका वाजवून, ऊन-पावसात मतदान करून ‘विधानसभा’ निर्माण कशाला निर्माण करायची व त्याच लोकशाहीचे कंबरडे मोडणारे निर्णय न्यायपालिकांनी द्यायचे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७०, बेळगाव सीमाप्रश्न अशा अनेक प्रकरणांवर अद्याप निकाल देण्यात आलेला नाही, न्यायालयांनी आधी यावर निकाल द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.