मुंबई : ‘एक देश, एक निवडणूक’ हे सूत्र राबविण्याला राज्यातील महायुती सरकारने पूर्ण पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संबंधीच्या संसदीय समितीसमोर सोमवारी याबाबतची भूमिका मांडली. ‘एक देश एक निवडणूक’ देशाच्या दृष्टीने लाभदायक असून सुदृढ लोकशाहीसाठीही आवश्यक आहे, असे मत फडणवीस आणि शिंदे यांनी संसदीय समितीसमोर सोमवारी व्यक्त केले.
या दोन्ही नेत्यांनी समितीसमोर अशी भूमिका मांडली की, एकाचवेळी निवडणुका घेतल्या तर पैशांची बचत होईल. वेगवेगळ्या निवडणुकांमुळे वारंवार आचारसंहिता लागू होते आणि विकासकामांना खीळ बसते. एकाचवेळी निवडणुका घेतल्याने सलग पाच वर्षांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी करणे शक्य होते.
‘लोकसभा भंग झाली तर...?’ निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या प्रस्तावाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लोकसभा भंग झाल्याची उदाहरणे आहेत, तसे भविष्यात झाले तर ‘एक देश, एक निवडणुकी’चे काय होईल, असा सवाल त्यांनी केला. चव्हाण यांनी याबाबत माध्यमांना सोमवारी माहिती दिली.