लोकसभा मतदारसंघात आधी भाजपाचा आणि मग शिवसेनेचा बालेकिल्ला होता. अपवाद फक्त काही काळ खासदार झालेल्या काँग्रेसच्या शांताराम घोलपांचा. हा शिवसेनेचा गड राम कापसे आणि प्रकाश परांजपे यांनी सातत्याने राखला. त्याला २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांनी सुरुंग लावला. समाजातील व नाईक परिवारातील तरुण सुशिक्षित उमेदवार म्हणून ठाणेकरांनी त्यांना संधी दिली. त्यांच्या या विजयात मनसेच्या राजन राजे यांनी घेतलेल्या लाखांहून अधिक मतांचा व शिवसेनेने विजय चौगुलेंसारख्या उमेदवाराला संधी दिल्याचा मतदारांत असलेला राग या दोन घटकांचा सिंहाचा वाटा होता. हे समजून घेण्यात नाईक परिवार आणि राष्ट्रवादी या वेळी असमर्थ ठरले. त्यातून संजीव नाईकांचा पराभव घडून आला. शिवसेनेने राजन विचारे यांना उमेदवारी दिली तेव्हा एकदम कच्चा उमेदवार दिला आता काळजीचे कारण नाही अशी उद्दाम भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली. मनसेने अभिजित पानसेंसारख्या इम्पोर्र्टेड आणि नवशिक्या उमेदवाराला संधी दिल्यामुळे आता तर आपला विजय निवडणुकीपूर्वीच निश्चित झाला आहे. अशा भ्रमात राष्ट्रवादी होता. काँग्रेसवाल्यांना तर कोणाच्याही हातून का असेना नाईक कुटुंबांच्या राजकीय वर्चस्वाचे नाक कापले गेले तर हवेच होते. त्यामुळे त्यांनी नाईकांना सावध करण्यापेक्षा भ्रमातच ठेवणे पसंत केले. संजीव नाईक यांचा पराभव त्यांनी आणि त्यांच्या पिताश्रींनी ओढावून घेतला आहे. निवडणूक जरी लोकसभेची असली तरी, काहीही झाले तरी आता संजूबाबा नकोच अशी मतदारांची मानसिकता गेल्या पाच वर्षांत हळूहळू साकारत गेली. मी मंत्री, मी आमदार, माझा मुलगा खासदार माझा मुलगा आमदार, पुतण्या, महापौर अशी राष्ट्रवादीतील सगळ्यात मोठी घराणेशाही नाईकांनी आरंभीली. त्यामुळे स्व-पक्षातलेच नेते, कार्यकर्ते, नगरसेवक धुमसायला लागले. अगदी महापालिकेतील ठेके आणि कामातली टक्केवारीसुद्धा गणेशार्पण होऊ लागल्याने मग आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायला आणि सभेला गर्दी गोळा करून टाळ्या पिटायलाच पक्षात आलो की काय, असा सवाल ते करू लागले. त्यात पवारांनी हाफ चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार काय? असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचाही फटका बसला. महायुतीच्या व्होट बँकेला सुरुंग लावण्यासाठी मनसेची उमेदवारी उपयुक्त ठरेल असे घड्याळजी समजत होते. पण ती संजीव यांच्याच यशाच्या मुळावर उठली. मुन्नाभाईसदृश डॉक्टर होण्याचा त्यांचा प्रयत्न अंगाशी आला. तसेच मुझफ्फर हुसेन यांनी पुकारलेले मीरा-भार्इंदरमधील बंड व पुतणे वैभव नाईक यांनी नवी मुंबईतच संजीव यांना पराभूत करण्याचा उचललेला विडा या सगळ्या बाबी नाईकांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यात. यापासून आता नाईक पिता-पुत्र धडा घेतील का?
सेनेने काबीज केले ठाणे
By admin | Updated: May 17, 2014 01:59 IST