Thackeray Group Sushma Andhare: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप शिंदेसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी केला आहे. दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमातील मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. यानंतर संजय राऊतांसह ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विधानाचा निषेध करत खरपूस शब्दांत समाचार घेतला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही टीकास्त्र सोडले होते. आता पुन्हा एका सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मीडियाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली. २०१७ ते २०२२ पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही. २ मर्सिडीज दिल्या असे म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या २ मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांचा असा कोणता व्यवसाय आहे, ज्यामुळे त्यांची मालमत्ता जी आहे ती २५० कोटीची झाली. त्याची मालमत्ता आता तपासावी लागेल. नीलम गोऱ्हे यांच्यासारखा व्यक्तीला पैशाची कदर नाही. त्यांनी अनेक पदे भूषवली म्हणजे अनेक मर्सिडीजचे किंमत त्यात होती. नीलम गोऱ्हेंवर हा अब्रू नुकसानीचा दावा किती असेल, त्याची रक्कम किती असेल लवकरच सांगणार, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे
एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की, कलेक्शन किती होते. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे. यानंतर आता नाक घासून माफी मागितली तरी आमचा लढा असणारच. नीलम गोऱ्हे यांनी कर्तृत्व नसताना अनेक पदे भूषवली. मला वेळ आणू नका, आत्तापर्यंत त्यांनी काय-काय केले, मला या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.
दरम्यान, नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षानी चार वेळा आमदारकी दिली. त्यांनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेची एक साधी शाखाही उघडली नाही. त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हे सगळे काम नीलम गोऱ्हे बघायच्या, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.