ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 14 - पत्नीच्या डोक्यावर सळईने वार करुन तिच्या मृत्युस कारणीभूत ठरलेला पती रवी उर्फ विठ्ठल फकीरचंद साळुंके याला सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली .
कस्तुरीबाई विश्राम पवार (६०) रा. नारेगावयांची मुलगी ज्योतीचा विवाह १३ वर्षांपूर्वी रवि साळुंके याच्याशी झाला होता. त्यांना तीन मुले व एक मुलगी अशी अपत्ये झाली. रवि नेहमी पैशांची मागणी करुन पत्नीला मारहाण करत होता. ज्योती याबाबत आईला सांगतअसे. कस्तुरीबाई ज्योतीला पैसे देवून दोघांत समेट घडवुन आणत. १० जुलै २०१२ रोजी कस्तुरीबाई घरी असतांना त्यांना ज्योतीच्या घरमालकिनीचा फोन आला. त्यांनी कस्तुरीबाईला कैलास नगरला यायला सांगितले. रविने ज्योतीला पुन्हा पैसे आण म्हणत मारहाण केली होती. कस्तुरीबाई त्यांचा मुलगा राजु सोबत कैलास नगर येथे ज्योतीच्या घरी गेल्या असता ज्योती रडत बसली होती. ज्योतीने पती रवि हा दररोज मारहाण करुन पैशाची मागणी करतो, तसेच काल रात्रीही त्याने माहेरहुन पैसे घेवुन ये म्हणत मारहाण केली असे आई कस्तुरीबाईला सांगितले. मला येथुन घेवुन चला अशी विनवणी देखील केली. त्यामुळे कस्तुरीबाईंनी राजु याला रिक्षा घेवुन येण्यास सांगितले. कस्तुरीबाई रविला समजावून सांगण्यासाठी गेल्या असता तो त्यांच्या अंगावर धावुन आला. व लोखंडी सळईने ज्योतीच्या डोक्यात जोराचा फटका मारला. ही घटना पाहुन कस्तुरीबाई मध्ये आली असता त्यांच्या डोक्यात रविने सळईने वार केला. राजु रिक्षा घेवुन आला असता बेशुध्द अवस्थेत असलेल्या ज्योतीला कस्तुरीबाई व राजु यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. े १४ जुलै २०१२ पर्यंत ज्योती बेशुध्द अवस्थेत होती, उपचार सुरु असतांना तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. एम. लवगळे यांनी तपास करुन रविला अटक केली.
पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने आरोपी रवि उर्फ विठ्ठल सांळुकेला भा.दं.वि.कलम ३०४(२) अन्वे १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा,५ हजार रुपये दंड, तसेच कलम ३२४ अन्वे २ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड ठोठावला.आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगावयाच्या आहेत.