मुंबई : येत्या डिसेंबर अखेरपर्यंत गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या हद्दीत दहा हजार घरे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर तयार घरांची लॉटरी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली. गिरणी कामगारांतर्फे बुधवारी मुंबईत मोर्चा आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी पाचही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सरकार गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. याबाबत गुरूवारी सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एमएमआरडीए हद्दीत दहा हजार घरे डिसेंबरपर्यंत दिली जातील. ज्या सहा गिरण्यांच्या जागेवर घरांचे काम सुरू आहे तेथील लॉटरी प्रक्रियेला लवकरच सुरूवात करण्यात येईल. तर १६ गिरणीच्या जागेवरील घरांच्या बांधकामाचे आराखडे तयार करून कामाला सुरुवात करण्याबाबत महापालिका आणि म्हाडाला निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात आशिष शेलार यांच्यासह गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, जयश्री खाडीलकर- पांडे, प्रविण घाग, गोविंद मोहिते, अण्णा शिरसेकर, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, नंदू पारकर, हेमंत गोसावी, जयप्रकाश भिल्लारे, गावडे यांचा समावेश होता....तरीही मोर्चा होणारचमुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत विधानसभेत निवेदन करण्याचे आश्वासन दिले असले तरी बुधवारचा गिरणी कामगारांचा नियोजित मोर्चा मात्र रद्द करण्यात आलेला नाही. मोर्चा नियोजित कार्यक्रमाप्रमाणे निघणार असल्याचे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
गिरणी कामगारांना डिसेंबरपर्यंत दहा हजार घरे
By admin | Updated: July 15, 2015 02:46 IST