रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक आणि शिक्षण विरोधातील धोरणांचा निषेध करण्यासाठी दि. १५ ते १७ डिसेंबरअखेर महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघातर्फे तीन दिवसीय धोरण दुखवटा दिन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.शासनाच्या धोरणामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. त्याचा फटका प्राथमिकपासून उच्च शिक्षणातील शिक्षकांना बसत आहे. शिक्षणाचा हक्क (आरटीई)धोरण राबवताना राज्यातील सर्व जिल्ह्यात एकवाक्यता दिसून येत नाही. शिवाय संचमान्यता सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संचमान्यतेबाबत विविध विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यांमध्ये असमानता आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी आहे.काही शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समावेशनाबाबतही शासनाचे धोरण निश्चित नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही शिक्षकांना अतिरिक्त ठरवून कार्यमुक्त केले असले तरी अनेक संस्था अशा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यास तयार नसल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बहुतांश संस्था अतिरिक्त शिक्षकांना सोडण्यास तयार नाहीत. अतिरिक्त ठरविण्याचे निश्चित निकष कोणते, हे शासनाने स्पष्ट केले नसल्याने संस्थेला नको असलेल्या शिक्षकांनाच अतिरिक्त ठरविण्याचे प्रकार होत आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला बगल देऊन अतिरिक्त कर्मचारी ठरविल्याने शाळा- शाळांमधून वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षक - शिक्षकेतरांच्या अतिरिक्त ठरविण्याच्या धोरणामुळे शाळांमधील शैक्षणिक स्वास्थ्य हरवले आहे. या धोरणांचा निषेध करून शैक्षणिक वातावरण निर्मितीच्या मागणीसाठी राज्य फेडरेशनने धोरण दुखवटा दिन आंदोलन जाहीर केले आहे.महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे (फेडरेशन) सचिव ज्ञानेश्वर कानडे, उपाध्यक्ष भारत घुले, जिल्हा संघाचे सचिव अशोक आलमान यांनी पत्रक जाहीर केले असून, सर्व शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
शिक्षक पाळणार धोरण दुखवटा दिन
By admin | Updated: December 11, 2014 00:01 IST