औरंगाबाद : तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हे कधी होणार, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारताच जयललिता यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी दारूची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानेही पुढील तीन वर्षांत क्रमश: दारूबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. बंग म्हणाले, जयललिता यांनी दारुबंदीची सुरूवात केली. प्रथम बिहार, मग तामिळनाडू आता महाराष्ट्र कधी, हा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तामिळनाडूत दारुचा वापर व राज्य शासनाला दारुपासून मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. दारुच्या करावर पाणी सोडणे प्रत्येक राज्य शासनाला आवश्यक आहे. बिहारने ते केले. तामिळनाडूनेही त्याची सुरुवात केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने या रक्त-लांछित कराचा लोभ सोडावा. लोकांना पाणी हवे, दारु नको. म्हणून आता राज्याचे दारु धोरण बदलवून पुढील तीन वर्षांत क्रमश: दारुबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. पहिल्या वर्षात, सर्व आत्महत्याग्रस्त जिल्हे, दुष्काळग्रस्त जिल्हे व आदिवासी तालुके यामध्ये पूर्ण दारुबंदी करावी. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी उर्वरित भागातील सर्व दुकाने बंद करावीत. पण दारुबंदी केवळ पहिले पाऊल आहे. सोबतच जनजागृती, लोकसहभाग, कायदेशीर अंमलबाजवणी व व्यसनमुक्तीचा उपचार, असा चार कलमी कार्यक्रम लागू करुन उत्तरोत्तर दारुमुक्तीकडे वाटचाल करावी. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचा जिल्हाव्यापी प्रयोग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच सुरू होतो आहे. महाराष्ट्र गडचिरोलीपेक्षाही मागे राहणार का, असा सवाल त्यांनी केला.दर्द जब हद से गुजर जाता है...गालिब असे म्हणाला की, ‘दर्द जब हद से गुजर जाता है, खुद दवा बन जाता है’. दारुचा रोग फार वाढल्याने भारतात सर्वत्र जनता त्यावर उपाय शोधते आहे. ती गरज ओळखून राजकारणी प्रतिसाद देत आहेत. लोकशाहीत हे होणे अपेक्षितच आहे. महाराष्ट्राचा ‘मद्यराष्ट्र’ झाल्याने व येथील जनता चाळीस हजार कोटी रुपयांची वार्षिक दारु पीत असल्याने सरकारला या रोगावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे बंग यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
तामिळनाडूत दारुबंदीची सुरुवात, महाराष्ट्राचे काय?
By admin | Updated: May 24, 2016 03:31 IST