- प्रशासन अडचणीत
नाशिक : तलाठी पदासाठी सरकारने १३ सप्टेंबर रोजी राज्यपातळीवरील परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून, याच दिवशी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्वांत मोठी पर्वणी भरणार आहे. त्यासाठी महसूल यंत्रणा अगोदरच पर्वणीच्या नियोजनात गुंतलेली असताना परीक्षा कशी घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या काळात होणारी लिपिक पदाची परीक्षा मात्र शासनाने थेट आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.जिल्ह्यातील तलाठ्यांच्या ३८ व लिपिकाच्या आठ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. राज्य पातळीवर ज्या ज्या जिल्ह्यांत ही पदे रिक्त असतील तेथेही पद भरण्यास अनुमती देऊन एकाच वेळी त्यासाठी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सरकारने रिक्त पदे भरण्याची अनुमती देतानाच परीक्षेच्या तारखाही निश्चित केल्या आहेत. त्यात तलाठी पदासाठी १३ सप्टेंबर, तर लिपिक पदासाठी २० सप्टेंबर ही तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती. तथापि, गणेशोत्सवासाठी लिपिक पदाची परीक्षा ४ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे, मात्र सिंहस्थाची दुसरी महत्त्वाची पर्वणी १३ सप्टेंबर रोजी असूनही, तलाठी पदाची परीक्षा याच दिवशी घेण्याचा हेका कायम आहे.