मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करताना स्कूल बस, रिक्षा आणि व्हॅन चालक, मालकांकडून परिवहन विभागाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. ही बाब ‘लोकमत’च्या ‘रिअॅलिटी चेक’मधून उघडकीस आल्यानंतर मुंबईत झालेल्या जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून रिक्षा आणि व्हॅनवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तर बस मालक आणि चालकांकडूनही नियमांचे पालन केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली.मुंबई शहर व उपनगरात जवळपास ३,0९५ स्कूल बस आहेत. यात परवानाप्राप्त शाळेच्या मालकीच्या स्कूल बसची संख्या ही १ हजार ४६५ तर शाळेच्या मालकीच्या व्यतिरिक्त करारावरील परवानाप्राप्त स्कूल बसची संख्या १ हजार ६३0 एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी परिवहन विभागाकडून नियमावली आखून देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई परिवहन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या आरटीओकडून केली जाते. तरीही पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होते. स्कूल बसच्या नियमांना धाब्यावर बसवल्याची हीच बाब २७ जून रोजी ‘लोकमत’मधून समोर आणण्यात आली. स्कूल बसबरोबरच रिक्षा आणि व्हॅनमधूनही शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करताना वाहतूक पोलिसांच्या नियमांना धाब्यावर बसवल्याचे यातून उघडकीस आणले. त्यानंतर यासंदर्भात स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून सोमवारी मुंबईत पार पडलेल्या जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत रिक्षा आणि व्हॅनवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ वाहतूक पोलीस, आरटीओ, बेस्टचे अधिकारी, सामाजिक संस्थेचे सदस्य उपस्थित होते. सर्रासपणे नियमांचे पालन न करता शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक व्हॅन आणि रिक्षांमधून होत असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी बैठकीत केली. >सुरक्षेबाबत तडजोड नाहीस्कूल बस चालक आणि मालकांनीही नियमांचे पालन करावे यासाठी त्यांना सूचना देण्यात येतील, असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग बैठकीत ते म्हणाले. यासंदर्भात प्रत्यक्षात अनिल गर्ग यांच्याशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्यांची ने-आण करताना करण्यात येणाऱ्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे व्हॅन आणि रिक्षांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आम्ही आमच्या सर्व सदस्यांनाही नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आव्हान करणार असल्याचे ते म्हणाले.
रिक्षा, व्हॅनवरही कठोर कारवाई करा
By admin | Updated: June 28, 2016 02:02 IST