पिंपरी : उत्तम बैठकव्यवस्था, दर्जेदार जेवण, सेवा-सुविधा या सर्वच गोष्टींच्या बाबतीत हॉटेल व्यावसायिकांमध्ये नेहमीच स्पर्धा सुरू असते. शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाय-फाय सुविधा देणे सुरू केले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लोक राहतात. आयटी पार्कमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक परराज्यांतील आहेत. शिक्षणासाठीही राज्यातील अनेक शहरांतून व राज्याबाहेरून विद्यार्थी आले आहेत. विविध नामांकित कंपन्या शहराच्या आसपास सुरू झाल्या आहेत. यामुळे कामगारांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाहेरून आलेल्या लोकांबरोबरच भूमिपुत्रही हॉटेल शौकीन झाले आहेत. लोकसंख्या वाढल्याने, जीवनमान उंचावल्याने हॉटेल व्यावसायिकांची चांदी झाली आहे. हॉटेलमध्ये जेवणे ही क्रेझ बनली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय वाढला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून युक्त्या लढविल्या जातात. काही जण भारतीय बैठक व्यवस्था करतात. काही ठिकाणी हट बनविल्या जातात. काही ठिकाणी फॅमिलीच्या आदरातिथ्यावर जास्त लक्ष दिले जाते; तर काही जण जोडप्यांना एकांत मिळण्याच्या दृष्टीने रचना करतात. सेवा देण्यातही कोणतीच कसूर केली जात नाही. यातच भर म्हणजे हॉटेल व्यावसायिकांनी आता वाय-फाय सुविधा देणेही सुरू केले आहे. पिंपरीतील एका हॉटेल व्यावसायिकाने ग्राहकांसाठी वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. आॅर्डर दिल्यानंतर ग्राहकाला वाय-फायचा पासवर्ड दिला जातो. जेवण होईपर्यंत मोबाइलचा आनंद लुटला जातो. विविध चित्रपट, गाणी डाऊनलोड करणाऱ्यांसाठी याचा जास्त वापर केला जातो. बिल जमा करेपर्यंत ग्राहकांकडून नेटचा मनमुराद आनंद घेतला जातो. हॉटेल चालविण्यासाठी ही नवीन कल्पना आहे. ही सेवा विनामूल्य पुरविली जात आहे. (प्रतिनिधी)
जेवणासोबत घ्या ‘वाय-फाय’चा स्वाद
By admin | Updated: January 21, 2016 01:04 IST