राजकुमार जोंधळे,
लातूर- १९७२च्या भीषण दुष्काळात भटकंती करत आलेल्या चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड समाजातील चौथ्या पिढीची पावले शाळेच्या दिशेने वळली आहेत. केवळ शाळाच नव्हे, तर त्यांच्या हाती टॅबही आला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील बाभळगावच्या वैशालीनगरात राहणाऱ्या गोंड समाजातील या चिमुकल्यांच्या आयुष्याला परिवर्तनाची किनार लाभली आहे.बाभळगावच्या वैशालीनगरात ही ५० कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने कानमळ काढणे, मालिश करणे आणि गावोगावी वनऔषधी विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय. यातून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. केवळ शिक्षणाचा अभाव असल्यानेच तीन पिढ्यांच्या जीवनात दारिद्र्याची जळमटे होती. आता हा समाज शिक्षणाच्या, प्रगतीच्या आणि परिवर्तनाच्या वाटेवर मार्गक्रमण करतो आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गोंड समाजाची ३० मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या हाती संगणकाचा माऊस आला असून, टॅबवर ही मुले आपल्या आयुष्याला आकार देऊ लागली आहेत. पाच-पन्नास रुपयांसाठी दिवसभर भटकंती करणाऱ्या समाजाला शिक्षणाचा मार्ग हाती लागला आहे. परिणामी, प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालण्याचे स्वप्न या चिमुकल्यांच्या आई-बाबांचे आहे. >दारिद्र्याशी चार पिढ्यांचा संघर्ष...दारिद्र्याशी नाते सांगणाऱ्या चौथ्या पिढ्यांनी आता शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता मार्गावरून पुन्हा मागे वळून पाहायचे नाही, असा निर्धारच येथील अजय जामकर, किशन श्यामराव जामकर, श्याम जामकर आणि विशाल जामकर यांनी केला आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हेच आम्हाला आता पटले आहे, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.