लांजा : कोकणामध्ये सर्वांत जास्त आनंद साजरा करण्यात येणाऱ्या शिमगोत्सवाला मुंबई-पुणे येथील भक्तगण कोकणात दाखल होणार असल्याने स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराने मुंबई-पुणे या मोठ्या महानगरामध्ये थैमान घातले आहे. दिवसागणिक ‘स्वाईन फ्ल्यू’चे रूग्णांमध्ये वाढ व दगावण्यामध्ये वाढ होत असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील लोक मुंबई-पुणे या महानगरामध्ये नोकरीच्या निमित्ताने असल्याने कोकणातील शिमगोत्सवाला ते निश्चित हजेरी लावतात. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होळीला सुरुवात होत असून, ५ मार्च रोजी कोकणात शिमगोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे, भक्तगण आपापल्या गावातून हजर होणार आहेत. मुंबई-पुणे येथे मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या या स्वाईन फ्ल्यूची लागण झालेला रूग्ण गावी आला, तर गावोगावी या आजाराने लोक त्रस्त होण्याची भीती आहे. लांजा तालुक्यातील गवाणे येथील सुनील शंकर करंबेळे हा पुण्याहून आपल्या वडीलांच्या कार्यासाठी आला असताना त्याला स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने गवाणे ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणाही जोरात कामाला लागली आहे. इतर लोकांना याची लागण होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणेने खबरदारी घेतली आहे. दरम्यान ५ मार्च रोजी कोकणामध्ये होणाऱ्या शिमगोत्सवाला मुंबई-पुणे येथून येणाऱ्या भक्तांसाठी एस. टी. स्टँडवर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मोठ्या शहरात ‘स्वाईन फ्ल्यू’चा वाढत असलेला फैलाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने शिमगोत्सवाला येणाऱ्या चाकरमानी यांच्यापासून येथील जनतेला स्वाईन फ्ल्यूची लागण होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. या आजाराच्या वाढत्या फैलावामुळे सर्वजण धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)
शिमगोत्सवात स्वाईन फ्लूची भीती
By admin | Updated: February 19, 2015 23:40 IST