मुंबई : मुंबईतील एका मानांकित वीज कंपनीने बोरीवली परिसरातील काही ग्राहकांना चक्क गुजराती भाषेतील बिल दिले आहे. या बिलांच्या प्रती काही काळातच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बुधवारी सोशल मीडियावर एकच कल्लोळ झाला. या बिलांवर मनसेने आक्षेप नोंदवला आहे. एका ग्राहकालाही मोबाइलचे बिल गुजराती भाषेचा उल्लेख असलेले मिळाले. रेल्वे प्रवाशाला गुजरातीत संदेश असलेले रेल्वे तिकीट मिळाले.उत्तर मुंबईतील मनसेचे नेते आणि पक्षाचे उपाध्यक्ष नयन कदम यांनी संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारला. गुजरात किंवा चेन्नईत तुम्ही मराठीत वीज बिल द्याल का, असा सवाल करत मनसे उपाध्यक्ष कदम यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. कंपनीला दिलेल्या पत्रात, गुजराती भाषेत बिल देण्याची ही घटना चुकून घडली असल्यास, चूक लवकर दुरुस्त करावी. जर जाणीवपूर्वक भाषा वाद तुम्ही करत असाल, तर मनसेला आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नये. महाराष्ट्रात मराठी सोडून इतर कोणत्याही प्रांतिक भाषेत वीज बिले देऊ नये. अन्यथा, महाराष्ट्रात भाषिक वाद उसळल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी या कंपनीची असेल, असे म्हटले आहे. गुजराती भाषेत बिल छापण्याच्या या उद्योगामुळे मुंबईतील मराठी माणसांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्यातील एका मोबाइल ग्राहकालाही अशाच प्रकारचे गुजराती भाषेतील बिल प्राप्त झाले आहे. तर रेल्वेच्या काही तिकिटांवरही गुजराती भाषेत जाहिराती छापून आल्याचे काहींनी सोशल मीडियावर शेअर केल्याने या सगळ्या प्रकाराला आयती फोडणीच मिळाली. (प्रतिनिधी)
गुजराती भाषेतील बिलांमुळे आश्चर्य
By admin | Updated: March 2, 2017 02:05 IST