पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईमटाईम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील ‘आयआयटी’च्या सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि पंतप्रधानांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, आयआयटी मद्रासचे डायरेक्टर भास्कर राममूर्ती, प्राईम टाईम फाउंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम टाईम फाउंडेशन आणि ई-मॅगॅझीन ‘प्रिसेन्स’च्या वतीने प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरित्या प्रश्न उपस्थित करून त्याची तड लागेपर्यंत केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली जाते. या वर्षीच्या निवड समितीमध्ये खासदार आनंदराव अडसुळ व अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश होता. (वा.प्र.)
सुप्रिया सुळे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 02:43 IST