कोल्हापूर : कोल्हापूरच्या सुखदेव पाटील याची पॅलेस्टाईन येथे १ ते १५ आॅक्टोबरअखेर होणाऱ्या १९ वर्षांखालील एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात गोलरक्षक म्हणून निवड झाली. तो मूळचा कोल्हापुरातील बिद्री फॅक्टरीजवळील कसबा वाळवे या गावचा सुपुत्र आहे. त्याचे फुटबॉलचे कौशल्य पाहून त्याला त्याच्या कुटुंबीयांनी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत लहानपणीच दाखल केले होते. त्याचा तंत्रशुद्ध आणि शैलीदार फुटबॉल खेळ पाहून पुणे एफसी संघाने आपल्याकडे त्याला दत्तक म्हणून घेतले. विविध स्पर्धा आणि तेथील चमकदार कामगिरीवर त्याने पुणे एफसी संघाच्या वरिष्ठ संघात गोलरक्षक म्हणून स्थान पटकाविले. भारतातील सर्वांत मोठ्या आयलीग स्पर्धेत ‘अ’ गटात पुणे एफसी संघातून गोलरक्षक म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याच कामगिरीवर त्याची यापूर्वी एशियन फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात गोलरक्षक म्हणून निवड झाली होती.यंदाच्या आयलीग स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली. याच जोरावर त्याची गोवा येथे १९ वर्षांखालील संभाव्य भारतीय संघात निवड झाली. या संघाचे शिबिर गेले तीन महिने गोवा येथे सुरू होते. तेथेही त्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरल्याने त्याची पॅलेस्टाईन येथे १ ते १५ आॅक्टोबरअखेर होणाऱ्या एएफसी अर्थात एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघात गोलरक्षक म्हणून निवड झाली. सुखदेव या स्पर्धेत २ आॅक्टोबरला पहिला सामना पॅलेस्टाईन विरोधी, तर ४ आॅक्टोबरला अरब अमिराती या संघाविरोधात खेळणार आहे. ६ आॅक्टोबरला तो तिसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्याला विशेषत: गोलरक्षणातील तंत्रशुद्ध धडे आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक रॅमेद हे देत आहेत.
कोल्हापूरचा सुखदेव भारतीय संघात
By admin | Updated: September 29, 2015 00:09 IST