नागपूर : लग्नाला पाच वर्षे होऊनही मातृत्वसुख लाभले नसल्याने निराश झालेल्या एका महिलेने आत्महत्या केली. ओमकारनगर अजनीतील रेणूका अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी २ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. पिंकी अखिलेश पंचेश्वर (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे.पिंकीचे पती अखिलेश हे पिंपळा गावाजवळ बांधकामस्थळी काम करतात. सोमवारी सकाळी कामावर गेल्यानंतर नेहमीप्रमाणे दुपारी २ वाजता ते जेवण करायला घरी आले. आतून दार बंद असल्याने त्यांनी पत्नीला आवाज दिला. मात्र, बराच वेळ होऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखिलेशने घर मालकाला आवाज दिला. दोघांनी दार तोडून आत प्रवेश केला असता पिंकी जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडून दिसली. तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून अखिलेशने तिला मेडिकलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी पिंकीला तपासून मृत घोषित केले. पिंकीने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, लग्नाला पाच वर्षे होऊनही पिंकीला मुलबाळ झाले नाही. त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. मातृसुखापासून वंचित असल्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावला जात असून तिच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.---
मातृत्वसुखापासून वचिंत महिलेची आत्महत्या
By admin | Updated: July 26, 2016 20:12 IST