जामखेड (अहमदनगर) : सराफांच्या कामबंद आंदोलनामुळे सुमारे दीड महिन्यापासून रोजगार नसल्याने हताश झालेल्या एका तरुण सुवर्ण कारागिराने शनिवारी दुपारी येथे पेटवून घेऊन आत्महत्या केली. अजहर शेख (१८) असे त्याचेनाव आहे.अजहरने दुपारी २ वाजता अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्यानंतर त्यास जामखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह पश्चिम बंगालला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामचंद्र देसाई यांनी दिली.जामखेडमध्ये मोठी बाजारपेठ आहे. येथे पश्चिम बंगालमधील जवळपास ८० कारागीर कामाला आहेत. सध्या सराफांचा बंदअसल्याने हे सर्व कारागीर बेकार झाले आहेत. बंद सुरू झाल्यानंतर अजहर महिन्यापूर्वी पश्चिम बंगालला गावी गेला होता. परंतु तेथेही काहीच काम न मिळाल्याने तो ८ एप्रिलला पुन्हा जामखेडला आला होता. त्यानंतरही बंद चालूच असल्याने त्याला पैशांची मोठी चणचण जाणवत होती. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सुवर्ण कारागिराची नगरमध्ये आत्महत्या
By admin | Updated: April 11, 2016 03:09 IST