ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - विदर्भात शेतजमिनीच्या सिंचनाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत 50 टक्के सिंचन क्षमतेचा विकास होत नाही, तोपर्यंत येत नाही, तोपर्यंत शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र शासनाला 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने जलसंवर्धनासाठी मोठे पाऊल उचलले आहे आणि यामुळे भूजल पातळीदेखील वाढत आहे. मात्र सिंचन क्षमता आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतक-यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेता विदर्भात विविध योजना आणण्यात येत आहे. विदर्भात दूध उत्पादन वाढावे व यातून शेतक-यांचा फायदा व्हावा यासाठी विशेष प्रकल्प सुरू होणार आहे. याची जबाबदारी ‘एनडीडीबी’ला (नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड) देण्यात आली असून २५ लाख लीटर दूध उत्पादनाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेत विदर्भातील ७ तर मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील ३ ते ५ लाख शेतकºयांना लाभ होईल, असे गडकरी यांनी सांगितले. नागपूर मनपाने ‘एनडीडीबी’ला शहरातील ४० ठिकाणांवर दूध विकण्याची परवानगी दिली आहे. ४ जून रोजी नागपुरात या योजनेचा शुभारंभ होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.गडचिरोलीत अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू झाले असून यामुळे ५ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच गडचिरोली व वर्धा येथून मध गोळा करून त्याची आयात करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायाला वाढविण्यासाठीदेखील योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना जोडधंदा सहज उपलब्ध होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.