नाशिक : बसच्या चाकाखाली चिरडून अडीच वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना येथे बुधवारी घडली. घटनेनंतर संतप्त बसवर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार केला. पंचवटीतील गणेशवाडी परिसरामधील अश्विन चव्हाण यांचा अडीच वर्षाचा मुलगा रोनित व मुलगी जीविका दोघे पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या हरिबाई देसाई माँटेसरी शाळेत शिकतात. बुधवारी दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर त्यांची आजी संगिता चव्हाण त्यांना घराकडे नेत होत्या. त्यावेळी भरधाव बसने त्यांना धडक दिली. त्यात रोनित मागच्या चाकाखाली चिरडला गेला तर संगिता चव्हाण बसखाली अडकल्या. जीविका सुदैवाने बाजूला फेकली गेली. रोनित व चव्हाण यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू रोनितचा मृत्यू झाला.अपघातात बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच जमाव रस्त्यावर गोळा झाला. त्यांनी बसच्या काचा फोडल्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. (प्रतिनिधी)
बसखाली चिरडून बालक ठार
By admin | Updated: October 8, 2015 01:38 IST