लीनल गावडे,
मुंबई- शालेय स्तरावर दहावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मुंबईसारख्या शहरात पोटाची खळगी भरणाऱ्या अनेकांच्या वाट्याला शिक्षण येत नाही. पण प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता दहावीचा मनापासून अभ्यास करून दहावीत ९० टक्क्यांचा पल्ला गाठलेल्या काही ताऱ्यांचा शोध लोकमतने घेतला आहे.सकाळी वर्तमानपत्रे टाकून दहावीत ९० टक्के गुण मिळवण्याची किमया विरार येथील हिरेन मेस्त्री या विद्यार्थ्याने करून दाखवली. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पहाटे उठून विरार परिसरात हिरेन वर्तमानपत्रे टाकतो. त्याचे बाबा टेलर असून आई गृहिणी आहे. वडिलांवरील शिक्षणाचा भार हलका व्हावा, म्हणून हिरेनने स्वत:हून पेपर टाकण्याचे काम सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून तो स्वत:च्या पुस्तकांचा खर्च भागवतो. वर्षभर केलेल्या मेहनतीला यश आल्याची प्रतिक्रिया हिरेनने व्यक्त केली. पुढे डॉक्टर होण्याची इच्छा असून त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले. मालिकेचे चित्रीकरण आणि अभ्यास अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरत व्हायची. तरी पालक, शिक्षक आणि दिग्दर्शकांमुळे सर्व सुरळीत पार पडले. ८३ टक्के गुण मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. कला शाखेतून पुढील शिक्षण घेणार असून मानसशास्त्र विषयात मला पदवी मिळवायची आहे.- निधी भानुशाली, बालकलाकार