पुणे : ससून शासकीय रुग्णालयातील उपअधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केल्यामुळे रुग्णालयाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. रात्रीच्या वेळी ससून रुग्णालयात सुरक्षेसाठी असणाऱ्या पूनम झिरपे यांच्याशी जाधव यांनी असभ्य वर्तन केले होते. याबरोबरच रात्रपाळीला असणाऱ्या रंजना शिगवी यांच्याशीही डॉ. जाधव यांनी अश्लील भाषेत बोलून त्यांची छेड काढली. त्याबाबतची तक्रार झिरपे यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या कामगार संघटनेने शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची भेट घेतली. या वेळी उपअधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांना निलंबित करावे, अशी मागणीही करण्यात आली. त्यानुसार रुग्णालयाने कार्यवाही केली असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.डॉ. जाधव रुग्णालयात राऊंडला जातात, तेव्हा ते दारू पिऊन येत असल्याचीही तक्रार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली होती. ही बाबही खेदजनक असल्याचे मनसेने पत्रकात म्हटले आहे. याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे डॉ. जाधव यांच्याविषयी आलेल्या तक्रारीनुसार त्यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यांचा कार्यभार काढून घेण्यात आला असून, हे काम सध्या डॉ. अमोल शिंदे पाहणार आहेत. रुग्णालयाने एक समिती गठित केली असून याविषयाची सखोल चौकशी होऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.’’ मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील व सुशीला नेटके यांनी नेतृत्व केले. या वेळी कल्पना जाधव व इतर महिलाही उपस्थित होत्या. मनसेचे चिटणीस नरेंद्र तांबोळी आंदोलनात सहभागी झाले.सुरक्षाकर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित द्यारुग्णालयात सुरक्षारक्षकाचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगारही अनेक दिवसांपासून थकले आहेत. हे पगार त्वरित देण्यात यावेत अशीही मागणी मनसे कामगार संघटनेकडून करण्यात आली. तसे न झाल्यास येत्या काळात प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येर्ईल, असेही मनसेकडून सांगण्यात आले. याबाबत चंदनवाले म्हणाले, ‘‘सुरक्षारक्षकांचा केवळ २ महिन्यांचा पगार देणे बाकी असून, त्याचा शासकीय स्तरावर पाठपुरावा चालू आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा निर्णय होणार असून, कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत वेतन मिळेल.’’
उपअधीक्षकाचे महिलेशी गैरवर्तन
By admin | Updated: April 30, 2016 01:31 IST