पिंपरी : गिनिज बुक आॅफ द वर्ल्डमध्ये विक्रम नोंदविण्यासाठी थायलंड येथे समुद्राच्या पाण्याखाली तयार केलेल्या मानवी साखळीत पिंपरीतील दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांचे शहरवासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे. पिंपरीतील पोदार शाळेत शिकणाऱ्या सोहम ठाकूर (पाचवी), तनिषा ठाकूर (आठवी) या विद्यार्थ्यांनी विश्वविक्रम नोंदविलेल्या (स्क्युबा डायव्हिंग मानवी साखळी) उपक्रमात सहभाग घेतला. त्यांना या सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यापूर्वी अशाच प्रकारचा विश्वविक्रम १७३ लोकांनी इटली येथे एकत्रित येऊन नोंदवला होता. थायलंड येथे नुकत्याच नोंदवल्या गेलेल्या या विश्वविक्रमात १८२ जणांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांचे वडील राजकिरण यांना साहसी खेळात सहभागी होण्याची आवड आहे. त्यांच्याकडूनच मुलांनी प्रेरणा घेतली आहे. (प्रतिनिधी)
पिंपरीतील विद्यार्थ्यांची गिनिज बुकात नोंद
By admin | Updated: January 3, 2017 06:24 IST