मुंबई : शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांचा कर संबंधित विकासक थकवत असल्याचे उजेडात आले आहे़ याप्रकरणी पाठविण्यात आलेल्या काम बंद नोटीसलाही केराची टोपली दाखविली जात आहे़ त्यामुळे त्या बांधकामाचे प्रॉपर्टी कार्ड आपल्या नावावर करून मुजोर विकासकांच्या मुसक्या आवळण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे़मुंबईत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प सुरू असतात़ या इमारतींचे बांधकाम सुरू असले तरी त्याचा मालमत्ता कर विकासकाला पालिकेकडे जमा करावा लागतो़ परंतु बहुतांशी विकासक हा कर थकवून बांधकाम सुरूच ठेवतात़ इमारत प्रस्ताव विभागाने पाठविलेल्या काम बंद नोटीसलाही ही मंडळी जुमानत नाहीत़ त्यामुळे हा कर वसूल करताना कर निर्धारक व संकलन खाते मेटाकुटीस आले आहे़ अखेर अशा विकासकांना थकीत कर भरण्यास भाग पाडण्यासाठी पालिकेने नामी शक्कल लढविण्याचे ठरविले आहे़ संबंधित बांधकामाच्या प्रॉपर्टी कार्डवर पालिका आपला मालकी हक्क दाखविणार आहे, जेणेकरून विकासकाला बँकेतून कर्ज मिळणे कठीण होईल़ तसेच बांधकाम सुरू ठेवण्याचे प्रमाणपत्र (सी़सी़) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओ़सी़) मिळवण्यासाठी थकीत कर भरणे संबंधित विकासकाला भाग पडेल, असा विश्वास कर निर्धारक व संकलन खात्यातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केला़ (प्रतिनिधी)
मुजोर विकासकांच्या मुसक्या आवळणार
By admin | Updated: May 5, 2015 01:47 IST