मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून स्पाइस जेट विमान कंपनीच्या रद्द होणाऱ्या सेवांमुळे विमान प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुंबई ते चेन्नई आणि पुणे-मडगाव प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने २0 आणि २१ डिसेंबर रोजी विशेष प्रीमियम ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रीमियम ट्रेनमध्ये मागणीनुसार तिकिटांची किंमत भरमसाट वाढत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. स्पाइस जेट विमान कंपनीच्या रद्द होणाऱ्या विमान सेवांमुळे मध्य रेल्वेकडून एलटीटी ते चेन्नई प्रीमियम ट्रेन चालवण्यात येणार आहे. 0२00९ ट्रेन एलटीटीहून २0 डिसेंबर रोजी १७.२५ वाजता सुटेल आणि चेन्नई येथे दुसऱ्या दिवशी १७.0५ वाजता पोहोचेल. 0२0१0 ट्रेन चेन्नई येथून २१ डिसेंबर रोजी २0.00 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी २२.३५ वाजता पोहोचेल. या ट्रेनला पनवेल, पुणे, सोलापूर, रेनिगुंटा, अराकोन्नम स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे-मडगाव ट्रेनही चालवण्यात येणार असून, 0२0११ ट्रेन २१ डिसेंबर रोजी पुण्याहून 00.२५ वाजता सुटून मडगाव येथे त्याच दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. 0२0१२ ट्रेन त्याच दिवशी मडगाव येथून १६.३0 वाजता सुटून पुणे येथे ५.५0 वाजता पोहोचेल. या ट्रेनला लोणावळा, पनवेल, रत्नागिरी, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. या ट्रेनचे आरक्षण सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)
अडलेल्या विमान प्रवाशांना मध्य रेल्वेने नाडले!
By admin | Updated: December 20, 2014 03:20 IST