मुंबई : एसटी महामंडळाने अनेक आगारांमधील बस फेऱ्या थेट प्रवासी नसल्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दहापेक्षा जास्त थेट प्रवासी मिळत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. यात मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा, सिंधुदुर्ग आगारांतील बस फेऱ्या बंद केल्या जात असतानाच, मुंबईतील दोन आगारांतून सुटणाऱ्या फेऱ्याही टप्प्याटप्यात बंद केल्या जात आहेत. आधीच १४ फेऱ्या बंद करण्यात आल्यानंतर, आणखी ३१ फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी १९ जुलैपासून करण्यात आली आहे. यात मुंबई सेन्ट्रलमधून सुटणाऱ्या २0 तर परळ आगारातून सुटणाऱ्या अकरा बस फेऱ्यांचा समावेश आहे. मुंबई सेन्ट्रलमधून सुटणाऱ्या बस फेऱ्यांमध्ये बेंगलोर, हुबळी, विजापूरमार्गे सांगली, जमखडी, बेळगाव, शिर्डी, बार्शी, धुळे, तारकपूर, सोलापूर, मुक्ताईनगर, तर परळ आगारातून सुटणाऱ्या फेऱ्यांमध्ये अहमदपूर, औरंगाबाद, शिर्डी यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व फेऱ्यांचे एप्रिल ते मे महिन्यापर्यंतचे भारमान हे ५८ टक्के ते ६९ टक्केपर्यंत होते. (प्रतिनिधी)
एसटीच्या ३१ फेऱ्या बंद
By admin | Updated: July 20, 2016 05:54 IST