बेळगाव : गांजा विक्रीच्या प्रकरणातून झालेल्या हल्लयात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर समाजकंटकांनी शहरात दगडफेक करून दुकाने, वाहनांची मोडतोड करीत धुडगूस घातला. दगडफेकीत १० वाहने व १५ पेक्षा जास्त दुकानांचे नुकसान झाले आहे़ या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. धर्मर्वीर संभाजी चौकात व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र जमून समाजकंटकांच्या गुंडगिरीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. बुधवारी रात्री अनगोळ येथे मद्यप्राशन करीत असताना वादावादी होऊन फिरोज पठाण (२५) याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. हा हल्ला गांजा विक्रीच्या प्रकरणातून झाल्याचे समजते. फिरोज रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून लोकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी ग्लासवरील बोटांचे ठसे घेतले असून, त्याच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्ल्यानंतर लगेच अंगोल परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला. जिल्हा सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या. गुरुवारी दुपारी फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव केएलई रुग्णालयात जमला़ यावेळी केएलई रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी तेथून जमावाला पांगविल्यानंतर मोटारसायकलवरून शंभरहून अधिक युवक शहरात धुडगूस घातला़ (प्रतिनिधी)
बेळगावमध्ये तणाव!
By admin | Updated: September 26, 2014 03:01 IST