दरवर्षी ६ जून रोजी रायगडावरशिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तसेच या सोहळ्याला हजारो शिवप्रेमी उपस्थित राहताता. मात्र रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या या विधानांवरूवन आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. स्वातंत्र मिळून ७६ वर्षे झाली तरीसुद्धा आपण आपलं मानसिक अधिष्ठान हे ब्रिटिशांच्या अधीन ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीप्रमाणेच झाला होता. त्यामुळे त्याचा स्मरणदिन हा तिथीप्रमाणेच व्हायला पाहिजे, असे संभाजी भिडे म्हणाले.
तसेच रायगडावर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये. त्या पुतळ्याला राजकारणाचा विषय करता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. या कुत्र्याला काही ऐतिहासिक आघार नाही, असे इतिहास संशोधक म्हणत आहेत. मात्र हे इतिहास संशोधक काय उंचीचे आणि किती कुवतीचे आहेत, हे पाहिले पाहिजे. उचाग काही गलका करून इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय हे खरं म्हणायचं, हे काही बरोबर नाही. त्यासाठी एखादं स्वतंत्र संशोधन मंडळ नेमून निर्णय केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.