पनवेल : नवीन पनवेल येथील सेंट जॉर्ज चर्चवर दगड फेकणारे अद्याप मोकाट असून, या गुन्ह्याचा छडा लावण्यात रविवारी उशिरापर्यंत पोलिसांना यश आले नव्हते. या घटनांचा विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी निषेध नोंदवला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नेरे बाजूने मोटारसायकलवरून तिघे जण आले व त्यांनी गेटच्या बाहेरून आतमध्ये दगड फेकून पोबारा केला. ही घटना क्लोज सर्किट कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असली तरी त्या फूटेजमध्ये अस्पष्ट चित्रीकरण झाले आहे. काळोख असल्याने आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन थोरात यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी चर्चला भेट देऊन मेंबर्सशी चर्चा केली. या प्रकारचा निषेध नोंदवत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता ख्रिश्चन बांधवांनी कोणत्याही उग्र प्रतिक्रिया दिल्या नाहीत.सामंजस्यांची भूमिका घेत तपासयंत्रणांना सहकार्य केले. आमचा पोलीस यंत्रणेवर पूर्णत: विश्वास असून, अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांना पकडून शासन करेल, असा विश्वास चर्चच्या विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)‘चर्चला सुरक्षा द्या’च्पनवेल येथील चर्चवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत द बॉम्बे कॅथलिक सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.च्मुंबईतील ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांवर खुलेआम हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सभेचे अध्यक्ष जॉर्डन डिसूजा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले की, काही जातीयवादी संघटना राज्यात अनास्था माजवण्यासाठी हा प्रयत्न करीत आहेत. सरकारने तो राज्यभर पसरू देता कामा नये, म्हणून सभेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.च्सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी डिसूजा यांनी केली. शिवाय राज्यातील चर्च आणि ख्रिस्ती समाजाच्या शाळांबाहेर सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. हजारो ख्रिस्ती बांधवांनी मुंबईतील रस्त्यांवर १०० किलोमीटरहून लांब मानवी साखळी उभारली.
चर्चवर दगडफेक करणारे मोकाटच
By admin | Updated: March 23, 2015 01:05 IST