डिप्पी वांकाणी, मुंबईलोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीत अक्षरश: हजारो कागदपत्रे तपासावयाची असल्याने महामंडळाचा माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित आमदार रमेश कदम याच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी केली जाणार आहे. कदमला २५ आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यावर सीआयडी आग्रहाने ही मागणी करणार आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) कार्यालय सध्या कागदपत्रांच्या छाननीच्या कामामुळे एखाद्या आॅडिट कंपनीच्या कार्यालयासारखे दिसत आहे. या गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या खूप मोठ्या संख्येतील कागदपत्रांचा अभ्यास करायचा असल्यामुळे रमेश कदमची कोठडी वाढवून मागण्याचा विचार असल्याचे सीआयडीच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. ‘जोशाबा’च्या बोरीवली कार्यालयातून कदमच्या गैरव्यवहाराशी संबंधित दोन डझन फायलीही सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केल्या आहेत. जोशाबाच्या बोरीवली कार्यालयावर सीआयडीने छापे घातले होते, त्या ठिकाणी अधिकारी कदमलाही घेऊन गेले होते. आम्ही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची लेखा पुस्तके, प्रस्तावांच्या फायली व फायलींवर वरिष्ठांनी केलेली टिपणे घेऊन पाचारण केले आहे, असे सीआयडी अधिकाऱ्याने सांगितले. सीआयडीचे एक डझनपेक्षा जास्त अधिकारी सध्या त्यांनी जप्त केलेल्या कागदपत्रांतील नोंदी महामंडळाच्या बँक खात्यांतील नोंदींशी पडताळून बघत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत साह्य करण्यासाठी बीड, हिंगोली, परभणी, जालना, भंडारा व बुलडाणा येथील चौकशी अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. या चौकशीची सूत्रे उप अधीक्षकांकडे देण्यात आली असून, त्यांना हे सहा अधिकारी साह्य करतील.
कदमची कोठडी वाढवून हवी
By admin | Updated: August 22, 2015 01:00 IST