चिखली (जि. बुलडाणा) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे पुतळे जाळल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा एकरी २८ रुपये मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या घटनेचा निषेध म्हणून येथील भाजयुमो कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे पुतळे जाळले. नेत्यांचे पुतळे जाळल्यानंतर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत भाजयुमो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी केली. जमाबंदी आदेश झुगारणाऱ्या भाजयुमोच्या ८ ते १० कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नांदुरा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री फुंडकर यांचा पुतळा जाळल्याचे वृत्त चुकीचे असून या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. पीक विमा कंपन्याबरोबर झालेले करार हे भाऊसाहेब फुंडकर व सदाभाऊ खोत हे मंत्री होण्यापूर्वीचे आहेत. तरीसुद्धा दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाईचे निर्देश मंत्रीद्वयांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
भाजयुमोने बुलढाण्यात जाळले ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांचे पुतळे
By admin | Updated: September 14, 2016 06:33 IST