मुंबई : मुंबई शहराचे किमान तापमान १९ अंशांवर घसरल्याने मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली असून, आता राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमानदेखील घसरू लागले आहे. रविवारी सकाळच्या साडेआठ वाजताच्या नोंदीनुसार, राज्यात सर्वाधिक कमी तापमान गोंदिया येथे १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. परिणामी राज्याच्या हवामानात चढउतार नोंदविण्यात आले होते. तत्पूर्वी आलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरी १६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. परंतु वातावरणीय बदलामुळे पुन्हा त्यात काही अंशी वाढ झाली होती. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान खाली घसरले असून, उत्तरोत्तर यामध्ये आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
राज्याचा पारा घसरू लागला..!
By admin | Updated: November 24, 2014 03:34 IST