पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस सुरू असल्याने कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मे महिना असूनही लोकांना कडाक्याच्या उन्हापासून काहिसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.राज्यात एप्रिल महिन्यातच अनेक ठिकाणी विक्रमी तपमानाची नोंद झाली. त्यामुळे मे महिन्यात तपमानाचा पारा आणखी वर चढण्याची शक्यता होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे बहुतेक शहरांतील कमाल तपमानात घट झाली आहे. शुक्रवारी राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्यातील बहुतेक शहरांचा पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.राज्यातील काही शहरांतील कमाल तपमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.१, कोल्हापूर ३३.१, नाशिक ३८, सोलापूर ३४.५, औरंगाबाद ३५.६, परभणी ३५.९, नांदेड ३८, अकोला ३७.८, अमरावती ३७.८, चंद्रपूर - ३६.६, नागपूर ३५.९, वर्धा ३५.६.
राज्याचा पारा उतरला
By admin | Updated: May 9, 2014 21:47 IST